प्राच्यविद्या अभ्यासकांना माहिती तंत्रज्ञानाची साथ

Loksatta
January 3, 2019

अवघ्या १५ दिवसांत संस्थेच्या 'ई-लायब्ररी'ला २४ लाख ६ हजार ९२८ लोकांनी ‘हिट’ केले आहे.

भांडारकर संस्थेची 'ई-लायब्ररी' ठरली वाचकस्नेही; १५ दिवसांत साडेसतरा हजार लोकांकडून पाच लाखांहून अधिक पृष्ठांचे वाचन

प्राच्यविद्या क्षेत्रातील संशोधनासाठी जगभरात नावाजलेल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेची ‘ई-लायब्ररी’ वाचकस्नेही ठरली आहे. अवघ्या १५ दिवसांत संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’ला २४ लाख ६ हजार ९२८ लोकांनी ‘हिट’ केले आहे. त्यापैकी १७ हजार ६३८ जणांनी ‘ई-लायब्ररी’ला भेट दिली असून आतापर्यंत ५ लाख २ हजार ७३५ पृष्ठांचे वाचन झाले आहे. प्राच्यविद्या, भारतविद्या, तत्त्वज्ञान, इतिहास आणि धर्म अशा विविध शाखांमध्ये अभ्यासकांची उत्सुकता वाढत असून जगभरातील प्राच्यविद्या अभ्यासकांना माहिती तंत्रज्ञानाचे वरदान लाभले असल्याची प्रचिती या निमित्ताने आली आहे.

शताब्दी वर्षांत पदार्पण करताना भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने दुर्मीळ पोथ्या-हस्तलिखिते आणि प्राचीन ग्रंथांच्या डिजिटायझेशनचा प्रकल्प हाती घेतला होता. त्याचाच विस्तारित भाग म्हणून हे दुर्मीळ ग्रंथ जगभरातील वाचकांना खुले करण्याच्या उद्देशातून ‘ई-लायब्ररी’ साकारण्यात आली. त्यासाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सी-डॅक या अग्रणी संस्थेने सर्वतोपरी सहकार्य केले. सी-डॅकचे वरिष्ठ संचालक डॉ. दिनेश कात्रे यांनी संस्थेला लायब्ररी सॉफ्टवेअर उपलब्ध करून दिले. पहिल्या टप्प्यामध्ये एक हजार प्राचीन ग्रंथांचा समावेश असलेल्या ‘ई-लायब्ररी’चे १९ डिसेंबर रोजी महापौर मुक्ता टिळक आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. त्यानंतर अवघ्या १५ दिवसांत २४ लाखांहून अधिक जणांनी ‘हिट’ केल्यामुळे ही ‘ई-लायब्ररी’ वाचकस्नेही ठरली आहे, अशी माहिती भांडारकर संस्थेचे सहाय्यक सचिव आणि डिजिटायझेशन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. सुधीर वैशंपायन यांनी दिली.

भांडारकर संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’मध्ये सध्या केवळ एक हजार दुर्मीळ ग्रंथ अभ्यासक आणि संशोधकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यातील बहुतांश ग्रंथ हे किमान ७५ वर्षांपूर्वी प्रकाशित झालेले असल्यामुळे स्वामित्व हक्काचा मुद्दा उपस्थित झालेला नाही. ‘ई-लायब्ररी’मधील पुस्तकांचे वाचन करता येणार आहे. मात्र, सध्या तरी अभ्यासक आणि संशोधकांना ही पुस्तके डाउनलोड करता येणार नाहीत. ‘ई-लायब्ररी’ आता विकसित करण्यात येत असून मार्चअखेरीस किमान पाच हजार ग्रंथ उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तर, या डिसेंबरअखेपर्यंत ग्रंथांची संख्या १५ हजार करण्याचा संकल्प पूर्णत्वास नेण्यात येणार आहे, असेही वैशंपायन यांनी सांगितले.

‘ई-लायब्ररी’चा वेब सव्‍‌र्हर अहवाल

(१९ डिसेंबर ते २ जानेवारी - १५ दिवस)

 • हिट्स - २४ लाख ६ हजार ९२८
 • प्रत्यक्ष भेट (व्हिजिटर्स) - १७ हजार ६३८
 • वाचन झालेली पृष्ठसंख्या - ५ लाख २ हजार ७३५
 • दररोज वाचन झालेली पृष्ठसंख्या - ३३ हजार ५१५
 • प्रत्येक दिवशी भेट देणारे अभ्यासक - १ हजार २५४
 • ‘ई-लायब्ररी’ पाहण्याचा कालावधी

प्रत्येक दिवशी - २० तास ४० मिनिटे ३६ सेकंद

‘ई-लायब्ररी’ला भेट देणारे अभ्यासक

 • भारत - ७४.९ टक्के
 • इंडोनेशिया - ८.५ टक्के
 • अमेरिका - ६.५ टक्के
 • अपरिचित देश - २.९ टक्के
 • कॅनडा आणि चीन प्रत्येकी एक टक्का

BORI digital library : http://borilib.com/repository